‘कॅपिटल वन’ला 32.18 लाखांचा निव्वळ नफा -चेअरमन हंडे.
बेळगाव :
कॅपिटल वन या संस्थेने यंदाच्या अहवाल साली 31 मार्च 2024 अखेर निव्वळ 32 लाख 18 हजार 134 रुपये इतका विक्रमी नफा कमवला असून संस्थेकडे सुमारे 20 कोटी 21 लाख रुपयांच्या ठेवी आणि 155.02 कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे, अशी माहिती कॅपिटल वन सोसायटीचे संस्थापक – चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी दिली.
कॅपिटल वन या संस्थेची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे नुकतीच खेळीमेळीत पार पडली. याप्रसंगी चेअरमन हंडे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. संस्थेच्या आर्थिक कामकाजा बरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबवून गेली 15 वर्षे एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहे. यंदा या उपक्रमाअंतर्गत संस्थेने अखिल भारतीय स्तरावर एकांकिका बाल्य नाट्य लेखन स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. भविष्यात संस्थेच्या उलाढालीमध्ये वाढ करण्यासाठी कर्जदारांना कमीत कमी व्याजदरात कर्जपुरवठा तर ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याजदर देण्याचा संस्था प्रयास करीत आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. यावेळी सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याची घोषणा देखील चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी केली.
प्रारंभी संस्थेच्या प्रभारी समन्वयक स्नेहल कंग्राळकर यांनी अहवालाचे वाचन व सभेपुढील विषय वाचले. यावेळी प्रत्येक विषय व अहवालावर सविस्तर विवेचन शिवाजीराव हंडे यांनी केले. सभेला संस्थेचे उपाध्यक्ष शाम सुतार, संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतीवाडकर, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेच्या आयोजनामध्ये संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व पिग्मी संकलकांनी विशेष योगदान दिले. शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष श्याम सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.