बीसीसीआय नूतन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण उत्साहात.
बेळगाव:
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (बीसीसीआय) या संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर समारंभ उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहामध्ये गेल्या बुधवारी सायंकाळी बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. याप्रसंगी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे 2023-24 साला साठीचे नूतन अध्यक्ष सी. सी. होंडादकट्टी, उपाध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, सतीश कुलकर्णी, सेक्रेटरी किथ मचाडो, जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र मुतगेकर व खजिनदार रोहित कापडिया यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष राम भंडारी आणि बेळगाव जिल्हा औद्योगिक केंद्राचे उपसंचालक सत्यनारायण भट उपस्थित होते. प्रारंभी स्वागत गीतानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर आनंद देसाई व सतीश कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी मावळते अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांनी नूतन अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारणीकडे अधिकार सुपूर्द करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नूतन अध्यक्ष सी. सी. होंडादकट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त करून भावी उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे सत्यनारायण भट यांनी बेळगावच्या उद्योजकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा सदुपयोग करून उत्कर्ष साधावा असे सांगितले. त्याचप्रमाणे राम भंडारी यांनी बीसीसीआयच्या नूतन कार्यकारणीला शुभेच्छा देऊन एमएसएमईबद्दल माहिती दिली आणि औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या सांगितल्या.