अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, निवडणूक आयोगात पत्र दाखल
मुंबई :
नुकत्याच झालेल्या राजकीय महाभूकंपाच्या नंतर राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत अजित दादा पवार यांच्यासोबत 32 आणि पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी 18 आमदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये अजितदादा यांचे वजन चांगलेच वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जास्तीत जास्त आमदारांनी आपल्या बैठकीला उपस्थित राहावे म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंगळवारी प्रयत्न सुरू होते. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची बैठक झाली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती . तर अजित पवार गटाने वांद्रे येथील भुजबळ यांच्या संस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित केली आहे.
पक्षाच्या ५३ आमदारांपैकी किती आमदार कोणत्या गटाबरोबर आहेत हे स्पष्ट झालेले नव्हते. अजित पवार गटाने ४० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. बैठकीला उपस्थित राहावे म्हणून शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडून आमदारांशी दिवसभर संपर्क साधण्यात येत होता.
अजित पवार यांच्याकडूनही आमदारांना बैठकीचे निरोप देण्यात आले होते . प्रत्यक्ष बैठक सुरू झाल्यानंतर 32 विरुद्ध 18 असा सामना रंगल्याचे दिसून आले.