बेळगाव, ता. ६ :
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी शुक्रवारी (ता.७) जाहीर होणार असल्याची माहिती प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळीI यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या ४२ उमेदवारांची यादी गुरुवारी (ता. ६) जाहीर झाली. त्यानंतर जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
जारकीहोळी पुढे म्हणाले,उमेदवारांची नावे निश्चित करण्याआधी प्रत्येक मतदारसंघात सर्वांगाने सर्वेक्षण करण्यात आले आहे. मतदारसंघातील स्थानिक नेत्यांची मते आजमावण्यात आली आहेत. त्यानंतर मतदारसंघातील इच्छुकांची मते जाणून घेवून उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
पक्षाच्या उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा, प्रत्येक मतदाराच्या दारात त्यांना पोहोचता यावे यासाठीच उमेदवारांची तिसरी यादी तातडीने जाहीर केली जाणार आहे. काही मतदारसंघात नव्या किंवा चर्चेतल्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, पण तो निर्णय पक्षाचा आहे.