आजपासून आयपीएलचा “रन”संग्राम
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 ला आजपासून (31मार्च) सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलला उद्घाटन सोहळा म्हणजे ओपनिंग सेरेनमीसह सुरुवात होणार आहे. सुमारे पाच वर्षानंतर आयपीएलला ओपनिंग सेरेमनीसह सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदा धूमधडाक्यात आयपीएलला सुरुवात होणार आहे. ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड तडका पाहायला मिळणार आहे.
पाच वर्षानंतर रंगणार आयपीएलचा उद्घाटन सोहळा आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन शेवटच्या वेळी 2018 मध्ये करण्यात आलं होतं. यानंतर, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळेही हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यावेळी उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडच्या तडक्यासोबतच ड्रोन शोचंही आयोजन करण्यात येणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया आणि गायक अरिजित सिंह आयपीएलच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत. याशिवाय कतरिना कैफ आणि टायगर श्रॉफ देखील उद्घाटन समारंभात परफॉर्म करतान दिसणार आहेत.आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
उद्घाटन समारंभ 31 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल. हा उद्घाटन सोहळा सुमारे 45 मिनिटे चालण्याची शक्यता आहे.