कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सहा मंत्र्यांची समिती
बेळगाव :
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अखेर केंद्रीय
गृहखात्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रत्येकी 3 अशा 6
मंत्र्यांच्या समन्वय समितीची स्थापना केली आहे.
समितीमध्ये महाराष्ट्राकडून संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत
पाटील, अबकारी मंत्री शंभूराज देसाई आणि शालेय शिक्षण
मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश आहे. तर
कर्नाटकाकडून पाटबंधारे मंत्री तसेच बेळगाव जिल्ह्याचे
पालकमंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय मंत्री आणि
निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले तसेच कायदामंत्री
जे. सी. माधुस्वामी यांचा समावेश आहे. केंद्रीय गृह
खात्यातून सहा मंत्र्यांच्या समितीच्या नियुक्तीचे पत्र दोन्ही
राज्यांच्या मुख्य
सचिवांना पाठवण्यात आले आहे. 1 मार्च
रोजी गृहखात्याचे सहसचिव जी. पार्थसारथी यांच्या सहीने
हे पत्र काढण्यात आले असून, दोन्ही राज्यांतील मंत्र्यांनी
आपल्या वेळेनुसार आवश्यक बैठका घेऊन त्याचा अहवाल
केंद्रीय गृह खात्याला पाठवावा, अशा सूचना करण्यात
आल्या आहेत.
बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले करण्यात
आल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर
दावा केला. महाराष्ट्रातील मंत्र्यांना सीमाभागात प्रवेशबंदी
करण्यात आली. त्यामुळे सीमावाद पेटला होता. याची
दखल घेत अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई, गृहमंत्री अरग
ज्ञानेंद्र यांची दिल्लीत 14 डिसेंबर रोजी संयुक्त बैठक
घेतली. या बैठकीत जोपर्यंत सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात
आहे, तोपर्यंत वादग्रस्त भागावर कोणीही दावा करू नये,
सीमाभागातील कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येकी
तीन मंत्र्यांची अशी सहा मंत्र्यांची संयुक्त समिती स्थापन
करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आता या
समितीची स्थापना करण्यात आली आहे.